कर्जरुपात घेतलेले 30 हजार परत करण्यास सांगितल्याने रातोरात एका व्यक्तीचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना धारवाड तालुक्यातील उप्पीन बेटगेरी व हारो बेळवडी दरम्यानच्या रस्त्यावर घडली.
धारवाड तालुक्यातील तडकोड गावातील 42 वर्षीय सुरेश देवराहोरू याचा खून झाल्याची माहिती आहे. शिवाप्पा बडगेरी असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. सुरेश याने शिवाप्पा बडगेरी याला 60 हजार रुपये उसने दिले होते. हत्येतील आरोपी शिवाप्पा याने 30 हजार रुपये परत केले होते. मात्र उरलेले 30 हजार परत करण्यासाठी सुरेशने तगादा लावला होता.
त्यावरून या दोघांमध्ये वरचेवर भांडणे होत. त्यातूनच शिवाप्पाने सुरेशचा काटा काढण्यासाठी म्हणून पैसे परत करण्यासाठी म्हणून बोलावून घेतले. त्यानंतर सुरेशवर रॉडने हल्ला करून बेदम मारहाण केली. त्यात डोके फुटल्याने सुरेशचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर शिवाप्पाने सुरेशचा अपघात झाल्याचे भासविण्याचा बनाव केला. मात्र पोलिसांनी तो शिताफीने हाणून पाडला. या प्रकरणी गरग पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


Recent Comments