Dharwad

लोकायुक्त न्यायमूर्तींनी दिली धारवाड जिल्हा रुग्णालयाला भेट

Share

धारवाड जिल्हा रुग्णालयातील काही समस्यांबाबत तक्रारी आल्यानंतर लोकायुक्त न्यायमूर्ती बी. एस. पाटील यांनी आज जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयाच्या आवारातील खराब रस्ता, औषध वितरणातील अनागोंदी, कर्मचाऱ्यांची कमतरता आदी समस्या पाहून न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली.

हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागाला भेट देऊन लोकायुक्त न्यायमूर्ती बी. एस. पाटील यांनी किती औषधे दिली गेली याची माहितीच विभागात नसल्याने नाराजी व्यक्त केली. रुग्णालयाच्या आवारातील खराब झालेला रस्ता पाहिल्यानंतर महापालिकेचे आयुक्त ईश्वर उल्लागड्डी यांना तत्काळ रस्ता दुरुस्त करण्याच्या सक्त सूचना दिल्या. त्यानंतर थेट लहान मुलांचा विभाग, आयसीयू विभाग, ओपीडी, प्रसूती विभाग, आपत्कालीन विभागाला भेट दिली. जिल्हा रुग्णालयात किरकोळ आजारांवर तपासणी व आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याची सूचना केली. न्यायमूर्तींनी शल्यचिकित्सक डॉ. गबी यांना प्रत्येक रुग्णाला खासगी किंवा किम्स रुग्णालयात पाठवणे थांबवावे असे निर्देश दिले.

त्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी ऐकल्या आहेत, त्यामुळे आता भेट देऊन वास्तव जाणून घेतले आहे. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना आधीच सांगितले आहे. असाच निष्काळजीपणा पुन्हा सुरू राहिल्यास कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.

Tags: