Belagavi

बुद्ध मंदिर पाडण्यास दलित संघटनांचा मनपाला विरोध

Share

बेळगावातील विश्वेश्वरय्या नगरातील आदर्श कॉलनीतील छोट्या बुद्ध मंदिर पाडण्यास महापालिका अधिकाऱ्यांना विविध दलित संघटनांनी आक्रमक भूमिका घेत विरोध केल्याची घटना घडली.

बेळगावातील विश्वेश्वरय्या नगरातील आदर्श कॉलनीत खुल्या जागेत एक जुने छोटे बुद्ध मंदिर आहे. याठिकाणी बुद्ध जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी उपक्रम केले जातात. मात्र ही जागा महापालिकेच्या मालकीची आहे असे सांगत बेळगाव महापालिकेचे अधिकारी जेसीबीसह बुद्ध मंदिराचे अतिक्रमण झाले म्हणून ते पाडण्यासाठी म्हणून आज सकाळी तेथे दाखल झाले. याची माहिती मिळताच दलित नेते मल्लेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली विविध दलित संघटनांच्या प्रतिनिधींनी तेथे धाव घेतली. ही जागा बुद्ध मंदिराचीच असून, ते हटवू देणार नाही असा पवित्रा घेत त्यांनी जोरदार विरोध केला.

दलित संघटनांच्या प्रतिनिधींचा विरोध पाहून पालिका अधिकाऱ्यांनी मंदिर हटवण्याची प्रक्रिया थांबवली.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना मल्लेश चौगुले यांनी सांगितले की, विश्वेश्वरय्या नगरातील आदर्श कॉलनीतील या जागेत सुमारे 40 वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्ध यांचे मंदिर उभारले असून, तेथे पूजाअर्चा, बुद्ध जयंती, आंबेडकर जयंती आदी उपक्रम राबविले जातात. येत्या 4 जूनला बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर येणार असल्याने येथे एका छोट्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासाठी मंदिर नूतनीकरण, स्वच्छता आदी कामे करण्यात येत आहेत. त्याला हरकत घेत महापालिकेने मंदिर हटवण्याचा प्रयत्न करणे निषेधार्ह आहे. जागा आमची असल्याबाबत मागील आमदार फिरोज सेठ, मनपा आयुक्त आदींना आम्ही पत्राद्वारे कळविले आहे. सतीश जारकीहोळी यांनीही या ठिकाणी भेट दिलेली आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींनी जागा नावावर करून देतो असे आश्वासन दिले, पण ते पाळले नाही. यापुढे जागा ताब्यात घेण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याचे वाईट परिणाम होतील. दलित संघटना, समाज याला प्रखर विरोध करेल असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद म्हणाले की, मी या परिसरातच लहानाचा मोठा झालो, लहानपणापासून बुद्धमंदिर येथे पाहतोय. जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचे मंदिर हटवण्याचा प्रयत्न निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी बोलताना स्थानिक रहिवासी रवींद्र केळगडे यांनी सांगितले की, एससी, एसटी व सर्व समाजाच्या लोकांनी मिळून आदर्श कॉलनी निर्माण केली. त्याचवेळेस येथे छोटेखानी बुद्धमंदिर उभारले आहे. कार्यक्रमासाठी नूतनीकरण व परिसराची स्वच्छता करताना महापालिका अधिकाऱ्यांनी हे मंदिर हटवण्याचा प्रयत्न केला आहे. तो निषेधार्ह आहे. मनपाने हा प्रयत्न सोडून द्यावा अन्यथा दलित समाज व रहिवाशी त्याला तीव्र विरोध करतील असा इशारा त्यांनी दिला

एकंदर, बेळगावातील विश्वेश्वरय्या नगरातील आदर्श कॉलनीतील खुली जागा सरकारी मालकीची असल्याचे सांगत महापालिकेने तेथील बुद्ध मंदिर हटवण्याचा प्रयत्न केला आहे तर, दुसरीकडे दलित संघटनांनी मंदिर हटवण्यास तीव्र विरोध केलाय. हा प्रश्न सामंजस्याने सुटावा अशीच सर्वांची इच्छा आहे.

Tags: