Belagavi

बेळगावात विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिभावाने शनी जयंती

Share

बेळगावात वैशाख कृष्ण अमावस्येनिमित्त कलियुगातील न्यायाधिकारी शनीदेव यांची जयंती आज विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त पाटील गल्लीतील शनि मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून मानवजातीच्या कल्याणासाठी न्यायाच्या देवतेला साकडे घालण्यात आले.


शनैश्‍वर जयंतीनिमित्त आज बेळगावातील शनी मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शनिदेवाला तैलाभिषेक करून देवाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या. पाटील गल्लीतील शनी मंदिराचे मुख्य पुजारी विलास अध्यापक यांनी ‘आपली मराठी’सोबत बोलताना सांगितले की, पाटील गल्लीतील अध्यापक बंधूंच्या शनी मंदिरात आज मंदिराचे ट्रस्ट्री प्रकाश अध्यापक यांच्या नेतृत्वाखाली मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सूर्योदयाला शनी देवांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर तैलाभिषेक करून लघुरुद्राभिषेक करण्यात आला. अनेक संस्कृत पंडित, वेदमूर्तींनी यात भाग घेतला. त्यानंतर दिवसभर भाविकांना प्रसाद वितरण करण्यात आला. शनी जयंतीनिमित्त शनिदेवाची विशेष पूजा करून विश्वशांतीसाठी आणि जगभरातील सर्वांच्या पीडा दूर करण्यासाठी प्रार्थना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आज सकाळपासूनच भाविकांची गर्दी होत असून भाविकांनी रणरणत्या उन्हाची पर्वा न करता शनिदेवाचे दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली. केळकर बाग येथील नवग्रह मंदिर, खासबाग येथील नवग्रह मंदिर आदी मंदिरात दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

Tags: