Belagavi

कुत्र्यावरून भांडण; दोन कुटुंबात फ्रीस्टाईल हाणामारी ९ जण जखमी

Share

कुत्र्याच्या उपद्रव झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन कुटुंबात फ्रीस्टाईल हाणामारी होऊन नऊजण जखमी झाले. ही घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे येथील जयनगरमध्ये घडली.


पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मच्छे-जयनगर येथील कांबळे आणि दंडगल या दोन कुटुंबात कुत्र्यावरून शुक्रवारी पहाटे अडीजच्या सुमारास भांडण झाले. संतोष कांबळे यांचा पाळीव कुत्रा अंगावर आल्यावरून भांडणाला सुरवात झाली. शब्दाला शब्द लागून हे भांडण शिगेला पोहोचले. त्यात दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांच्या अंगावर जाऊन फ्रीस्टाईल हाणामारी केली. यात दोन्ही कुटुंबातील मिळून एकूण नऊजण जखमी झाले आहेत. जखमीत एका दहा वर्षीय बालकाचा समावेश आहे. यावेळी एकमेकांच्या घरातील साहित्याचेही नुकसान झाले आहे.

या घटनेत दंडगल कुटुंबातील सुनील दंडगल (वय ५४), भीमराव दंडगल (वय ४६), महादेवी दंडगल (वय ३६) आणि गौरव्वा दंडगल (वय ४३) तसेच गीता करगुप्पीकर (वय ४३) तर कांबळे कुटुंबातील रवींद्र कांबळे (वय ३४), नागव्वा कांबळे (वय ५३), संतोष कांबळे (वय ३७) आणि दहा वर्षीय बालक वरद संतोष कांबळे यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर बीम्स इस्पितळात उपचार करण्यात आले. या प्रकरणी संतोष कांबळे यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags: