दैनिक सामनाचे संपादक , खा . संजय राऊत याना बेळगाव न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे . महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ बेळगावमध्ये आले असताना त्यांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यांचा जामीन मंजूर झाला .
शिवसेनेचे माजी खा . संजय राऊत यांनी , २९ मार्च २०१८ रोजी एका मराठी वेब चॅनेलच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात , कर्नाटक विरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर
गुन्हा दाखल करण्यात आला होता . यासंबंधी त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता .
न्यायालयातून जामीन मिळवून बाहेर आल्यावर , माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रतिक्रिया देताना , संजय राऊत म्हणाले कि , हि एक न्यायालयीन प्रक्रिया होती . बेळगावात यायचे म्हणजे अशा प्रक्रियांना सामोरे जावे लागते . महाराष्ट्रातील नेते असोत कि स्थानिक नेते असोत , आम्हाला कायद्याच्या कचाट्यात अडकवले जाते . न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे . आणि जामीन मिळाला नसता तर अटक झाली असती . यावेळी त्यांनी पत्रकारानी विचारलेल्या अन्य प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले .
संजय राऊत यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणारे ऍड . शामसुंदर पत्तार आणि त्यांच्या सहकारी टीमने , आज सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली आणि संजय राऊत याना जामीन मिळाला . यासंबंधी माहिती देताना , ऍड . शामसुंदर पत्तार यांनी सांगितले कि , २९ मार्च २०१८ रोजी बेळगावमधील एका मराठी वेब चॅनेलच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . यावेळी त्यांनी आपल्या भाषणात , कर्नाटकच्या लोकांनी महाराष्ट्राच्या एका बसला आग लावली तर आम्ही महाराष्ट्रात कर्नाटकाच्या शंभर बसेस जाळू असे वक्तव्य केले होते . त्यांच्या या वक्तव्यावरून , कर्नाटक विरोधी वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता .
आज चतुर्थ जेएमएफसी न्यायालयात सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे . ऍड . हेमराज बेंचन्नावार , मारुती कामाण्णाचे आणि आमच्या सहकार्यांनी संजय राऊत यांच्या वतीने काम पाहिले .
यावेळी , शुभम शेळके , अरविंद नागनुरी , प्रकाश शिरोळकर , ऍड . अमर येळ्ळूरकर , कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष देवणे , संजय पवार तसेच अन्य उपस्थित होते .


Recent Comments