काँग्रेस म्हणजे प्रेक्षक नसलेली नाटक कंपनी बनली आहे. देशाला, राज्याला लाभलेला दुर्भाग्यपूर्ण शाप आहे अशी जहरी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली.
हुबळी-धारवाड पश्चिम मतदार संघातील भाजप उमेदवार आ. अरविंद बेल्लद यांच्या प्रचारासाठी अमरगोळ येथे बोम्मई यांनी आज भव्य रोड शो करून मतदारांना संबोधित केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, एखादी नाटक कंपनी प्रेक्षकांविना 8-10 फार तर 1 महिना चालते. नंतर दिवाळे निघाल्यावर मालक ती बंद करून टाकतो तसे काँग्रेसचे झाले आहे. काँग्रेस म्हणजे राज्याला, देशाला लाभलेला दुर्भाग्यच शाप आहे अशी टीका बोम्मई यांनी केली.
सध्या निवडणुकीमुळे काँग्रेसचे लिंगायतांवरील प्रेम उतू जात आहे. राहुल गांधी कुडलसंगमला जाऊन विभूती लावून घेत आहेत. पण सिद्दरामय्या मुख्यमंत्री असताना, काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या या भागात झाल्या.
तेंव्हा एकही काँग्रेस नेत्याने येथे येऊन शेतकऱ्यांचे, त्यांच्या कुटुंबांचे अश्रू पुसले नाहीत. आम्ही विरोधी पक्षात असूनही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबाना भेटून दिलासा देऊन मदत केली. मोदींच्या नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकारने देशाचा आणि कर्नाटकाचा आमूलाग्र विकास केला आहे.
आमच्या जनकल्याणकारी योजना सुरु ठेवून जनतेचे हिट साधण्यासाठी अरविंद बेल्लद यांना, भाजपला विजयी करून निवडून द्या असे आवाहन बोम्मई यांनी केले.
प्रारंभी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी भव्य रोड शो केला. यावेळी बोम्मई, अरविंद बेल्लद व वरिष्ठ पक्षनेते फुलांनी सजवलेल्या खुल्या वाहनात उभे राहून मतदारांना अभिवादन करत होते. रोड शो दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने बोम्मई व मान्यवरांना भव्य पुष्पहार घातला. शेकडो भाजप कार्यकर्ते रोड शोमध्ये सहभागी झाले होते.


Recent Comments