Agriculture

भारतीय किसान संघ उत्तर प्रांताच्या वतीने बेळगावात निदर्शने

Share

पीकविमा योजनेत शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान संघ उत्तर प्रांताच्या वतीने बेळगावात निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
पीकविमा योजनेत अनेक त्रुटी, दोष असल्याने भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना ठकवले जात असल्याचा आरोप करून हा प्रकार थांबविण्याची मागणी भारतीय किसान संघ उत्तर प्रांताच्या वतीने करण्यात आलीय. याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना भारतीय किसान संघ उत्तर प्रांताचे जिल्हाध्यक्ष शिवानंद सरदार यांनी सांगितले की, प्रधानमंत्री फसल बिमा योजनेत अनेक त्रुटी व दोष आहेत. त्या तातडीने दूर करण्याची गरज आहे. पीक नुकसान भरपाईपोटी सरकारकडून येणारे पैसे खासगी कंपन्या शेतकऱ्यांना न देता फसवणूक करत आहेत.

 

विमाकंपन्यांनी नेमलेले अधिकारी शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करत आहेत. शेतकऱ्याने 2 हजार रुपये भरलेले असतील तर केवळ 50-60 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होत आहेत. त्यामुळे सरकारी पैशांचा दुरुपयोग होत आहे. ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून देऊन त्यात सुधारणा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. पीकविमा योजनेबाबत शेतकऱ्यांना संपूर्ण नीट माहिती समुदाय रेडिओ केंद्रे, समाजमाध्यमे, कृषी, फलोद्यान, महसूल आदी खात्यांतर्फे देण्यात यावी अशी आमची मागणी आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी भारतीय किसान संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: