काल राज्योत्सव मिरवणुकीतील तरुणांच्या धुडगुसामुळे राणी चन्नम्मा चौक परिसरात असलेल्या चर्मकारांच्या शेडवजा दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांनी या दुकानासमोरील खांबे, शेडचे मोठे नुकसान केले आहे. या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल येथील व्यावसायिक उपस्थित करत आहेत.
बेळगावमध्ये काल राज्योत्सव दिनानिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत सामील होण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील विविध भागातील तरुण तरुणी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. मात्र मिरवणुकीतील बेशिस्तपणाचा फटका राणी चन्नम्मा चौकातील चर्मकारांच्या शेडवजा दुकानांना बसला आहे.

राणी चन्नम्मा चौक हे शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या चौकांपैकी एक आहे. काल याच चौकात मिरवणुकीत सहभागी झालेल्या कन्नड भाषिकांनी धुडघूस घालत हुल्लडबाजी केली. मुख्य मिरवणूक मार्ग सोडून आसपास असलेल्या शोरूमच्या परिसरात जाऊन तेथील शेड आणि खांबांचे नुकसान केले. सागर लाटे यांच्या दुकानाचे यात मोठे नुकसान झाले असून आता या नुकसानीची भरपाई कोण देणार? असा संतप्त सवाल या व्यावसायिकाने उपस्थित केला आहे.
आपल्या दुकानाच्या झालेल्या नुकसानी संदर्भात जिल्हाप्रशासन आणि आमदारांनी लक्ष पुरवून, आपल्या उपजीविकेचे साधन असणाऱ्या व्यवसायाचे झालेले नुकसान भरून देण्याची मागणी या व्यावसायिकाने केली आहे.


Recent Comments