Belagavi

चन्नम्मा यांचे जन्मगाव काकती येथे भव्य मिरवणुकीने कित्तूर उत्सवाला प्रारंभ

Share

चन्नम्मा कित्तूर उत्सव-2022 ची वीरराणी चन्नम्मा यांच्या जन्मगावी, काकती येथे भव्य मिरवणुकीने शानदार प्रारंभ करण्यात आला.

होय, रविवारी राणी चन्नम्मा यांच्या जन्मगावी काकती येथे बेळगाव जिल्हा प्रशासन, कन्नड आणि संस्कृती खाते, आणि पर्यटन खाते यांच्या वतीने चन्नम्मा कित्तूर उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, शहर पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नंतर विविध कला पथकांसह काकती गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक निघाली. यावेळी डोक्याबर जलकुंभ घेऊन महिला आणि चन्नम्माजींच्या वेषातील लहान मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

काकतीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन पक्ष-जातीचा विचार केला पाहिजे, असे मत या प्रसंगी बोलताना खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी व्यक्त केले. कित्तूर विकास प्राधिकरणाप्रमाणे काकतीचाही विकास होणे आवश्यक आहे. काकती किल्ला, देसाई यांच्या वाड्याच्या विकासासाठी 25 लाख रुपये निधी मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

त्यानंतर बोलताना, राज्य हस्तकला विकास महामंडळाचे अध्यक्ष मारुती अष्टगी म्हणाले, चन्नम्माजी कन्नडशी संबंधित आहेत. शिवाजी महाराज मराठीशी संबंधित आहेत ही भावना प्रथम आपण सोडून दिली पाहिजे. राणी चन्नम्माजी आणि शिवाजी महाराज हे असे थोर व्यक्ती आहेत, ज्यांनी आमच्या भूमीसाठी, पाण्यासाठी आणि रयतेच्या हक्कांसाठी लढा दिला. कित्तूर उत्सव प्रत्येक घरात सणाच्या पद्धतीने साजरा केला पाहिजे. त्या सिद्धेश्वराच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षापर्यंत कामे पूर्ण होवोत. कित्तूरचा चन्नम्मा यांचा राजवाडा कसा पुन्हा बांधला जात आहे, त्याचप्रमाणे काकती येथील देसाई यांच्या वाड्याचीही पुनर्बांधणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी ग्रापं सदस्य सिदगौडा सुनगार म्हणाले की, जाती, धर्म आणि पक्षभेद न ठेवता आपण सर्वांनी चन्नम्मा यांच्या वाड्याचा विकास करण्याचा संकल्प करूया. दरवर्षी भाषण द्यायचे आणि निघून जायचे असे व्हायला नको, राणी चन्नम्माजी यांच्या नावाची कमान राष्ट्रीय महामार्गावर उभारण्याची गरज आहे. तसेच गडाचा आणि चन्नम्माजींच्या घराण्याच्या वाड्याचा विकास व्हावा, असे त्यांनी सांगितले.

या नंतर, माजी तापं सदस्य यल्लप्पा कोळेकर चन्नम्माजी यांचे जन्मगाव आणि जन्मगाव काकती येथे विकास कामे करण्यात यावी. दरवर्षी आम्ही सरकारकडे विजयोत्सवासाठी आर्थिक मदतीची मागणी करतो, मात्र ते निधी देत ​​नाहीत. चन्नम्माजींच्या वाड्याच्या विकासासाठी अर्थसंकल्पात काही रक्कम राखीव ठेवण्यात आली आहे. याबाबत विशेष काळजी घेऊन अधिकाधिक निधी द्यावा व विकास करावा, असा आग्रह त्यांनी धरला.

शिवपूजी मठाचे राचय्या स्वामी यांच्या दिव्य सानिध्यात कार्यक्रम पार पडला. यावेळी शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, प्रांताधिकारी रवींद्र करलिंगन्नवर, काकती ग्रापं अध्यक्ष सुनील सुनगार, उपाध्यक्षा वर्षा मुचंडीकर, माजी जिपं उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्यासह इतर मान्यवर व चन्नम्माजींचे चाहते उपस्थित होते.

Tags:

kakati-rani-channamma-utsav-inauguration/