यंदा बेळगावात 1 नोव्हेंबरला होणाऱ्या काळा दिन कार्यक्रमाला महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी उपस्थित पाहणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना तसा शब्द दिला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून, येत्या 1 नोव्हेंबरला होणाऱ्या काळा दिन कार्यक्रमाला महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी पाठवून देण्याची विनंती केली होती. त्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी नुकतीच मुख्यमंत्री शिंदे यांच्या या संदर्भात फोनवरून चर्चा केली. त्यावेळी महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या दाव्याची त्वरित सुनावणी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करावेत, उच्चाधिकार व तज्ज्ञ समितीची बैठक लवकर बोलावून चर्चा घडवून आणावी, मुंबईतील सीमाप्रश्न कक्षात अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्वरित नेमणूक करावी, सीमाप्रश्नाच्या खटल्यात दिल्ली येथील वकील शिवाजीराव जाधव यांनी ज्येष्ठ वकील नियुक्तीबाबत पाठवलेल्या पत्रावर त्वरित कार्यवाही करावी आदी मागण्या मरगाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमावासियांच्या व्यथा ऐकून घेत, येत्या काळा दिन कार्यक्रमाला महाराष्ट्राचे प्रतिनिधी पाठवून देण्याचे तसेच अन्य मागण्याही त्वरित पूर्ण करू असे आश्वासन दिले. त्यामुळे सीमावासीयांत चैतन्य पसरले आहे.


Recent Comments