award

बेळगावात जीआयटीचा 6 वा दीक्षांत समारंभ उत्साहात; 1124 पदवीधरांना पदवी प्रदान

Share

बेळगाव येथील प्रतिष्ठित कर्नाटक लॉ सोसायटीच्या गोगटे तांत्रिक संस्थेचा (जीआयटी) 6 वा पदवीदान समारंभ आज उत्साहात पार पडला. यावेळी एकूण 1124 पदवीधरांना पदवी देऊन गौरविण्यात आले.

कर्नाटक लॉ सोसायटीच्या उद्यमबाग, बेळगाव येथील जीआयटी संस्थेच्या ‘ज्ञानगंगा’ प्रांगणात आज संस्थेचा 6 वा पदवीदान समारंभ पार पडला. केएलएसच्या रौप्यमहोत्सवी सभागृहात आज, शनिवारी झालेल्या या शानदार समारंभात आंध्र प्रदेशच्या केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. एस. ए. कोरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी पदवीदान भाषण केले. जीआयटीचे माजी विद्यार्थी व अशोक आयर्न ग्रुपचे सहव्यवस्थापकीय संचालक जयंत हुंबरवाडी, विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. विद्याशंकर एस., व्हीटीयूचे कुलसचिव प्रा. ए. एस. देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक लॉ सोसायटीचे अध्यक्ष अनंत मंडगी होते.

यावर्षी केएलएस जीआयटीने 779 बीई, 66 बी. आर्क पदवीधरांसह 845 पदवीधर विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यूजी विभागात गिरीश एम. प्रभुखानोलकर, मेकॅनिकल इंजिनीअरिंग यांनी सर्वाधिक 9.97 सीजीपीए मिळवले आहेत.

आणि श्वेता उगारे पीजी मध्ये एम.टेक. डिजिटल कम्युनिकेशन आणि नेटवर्किंगमध्ये सर्वाधिक 9.97 सीजीपीए मिळवून कॉलेजचे नाव उंचावले आहे. एकूण 1124 पदवीधरांना तात्पुरत्या पदवीने सन्मानित करण्यात आले, ज्यात 53 एम.टेक., 108 एमबीए आणि 118 एमसीए विद्यार्थी आणि 279 पदव्युत्तर विद्यार्थी यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाला संबोधित करताना व्हीटीयूचे कुलसचिव डॉ. ए. एस. देशपांडे यांनी, विद्यार्थ्यांच्या यशामध्ये जीआयटीची भूमिका विशेष असल्याचे सांगितले. गोगटे तांत्रिक संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये महाविद्यालय व्यवस्थापन, शिक्षक व पालक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कितीही प्रगती केली तरी महाविद्यालय, शिक्षक आणि पालकांना विसरू नये, असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना, व्हीटीयूचे कुलगुरु डॉ. विद्याशंकर म्हणाले, जीआयटीचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यरत असतात. त्यांच्यासाठी जगण्याचे चांगले मार्ग तयार करण्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी काम केले जात आहे. म्हणून मी सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार मानतो. आज सर्व विद्यार्थी आपले आयुष्य दुसऱ्या एका चांगल्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. इथे शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला समाजातील विविध प्रकारच्या व्यक्ती भेटणार आहेत. येणाऱ्या काळात अधिकाधिक शिक्षण ऑनलाइनद्वारे दिले जाईल. भारतात आणि विशेषतः कर्नाटकात शिकलेले विद्यार्थी आज जगातील अनेक प्रसिद्ध कंपन्यांमध्ये काम करत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने जीवनात उच्च ध्येय ठेवले पाहिजे असा कानमंत्री त्यांनी दिला.

या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक आणि इतर अनेकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

Tags:

6th graduation ceremony at git college belgaum