Belagavi

तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाण पुलाची उदघाटनानंतर दोनच दिवसात दुर्दशा

Share

बेळगावमधील तिसऱ्या रेल्वे गेटनजीक असलेल्या उड्डाणपुलाचा उद्घाटन समारंभ गेल्या दोन दिवसांपूर्वी खासदार मंगला अंगडी यांच्याहस्ते पार पडला. उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी या उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या दुर्दशेचे फोटो वायरल झाले असून उड्डाणपुलाच्या कामकाजाबाबत तक्रारींचा पाऊस पडत आहे.

तब्बल १४ महिन्यानंतर नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला तिसऱ्या रेल्वेगेट नजीकचा उड्डाणपूल उदघाट्नच्या दुसऱ्याच दिवशी समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. अवजड वाहतूक, अपघात आणि बेळगाव शहरात वाढलेली एकंदर वाहतूक यासाठी शहरात उभारण्यात आलेले उड्डाणपूल नागरिकांच्या सोयीपेक्षा समस्यांचेच कारण बनले आहे. तिसऱ्या रेल्वे गेटनजीक उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या रस्त्यावर खड्डे दिसून आल्याने या उड्डाणपुलाच्या कामकाजात गोलमाल झाला आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

गेल्या चार वर्षांपासून उड्डाणपुलाचे कामकाज सुरु होते. चार वर्षानंतर नागरिकांच्या सोयीसाठी खुला करण्यात आलेला उड्डाणपूल आणि यासंदर्भात पुढे आलेल्या समस्या यावरून रेल्वे खात्याच्या कामकाजाबाबत जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवाय या कामकाजातदेखील भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

या उड्डाणपुलाच्या कामकाजाबाबत संजय शहापूरकर आणि विशाल भाटिया या स्थानिक रहिवाशांनी सांगितले, कि उड्डाणपुलाचे कामकाज तर झाले पण या उड्डाणपुलाचे काम दर्जाहीन झाले आहे. या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांची वर्दळ सुरु झाली असून या रस्त्याची दुर्दशा अवघ्या दोनच दिवसात झाल्याचे समोर आले आहे. यापुढेही अशीच वाहतूक या उड्डाणपुलावरून सुरु झाली तर या उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेची शाश्वती नसल्याचे मत या नागरिकांनी व्यक्त केले. शिवाय याकडे अधिकाऱ्यांचेही मोठे दुर्लक्ष झाल्याचे या नागरिकांनी सांगितले.

यासंदर्भात एका ऑटो रिक्षा चालकाने सांगितले, गेल्या चार दिवसांपासून उड्डाणपुलाचे कामकाज सुरु आहे. चार वर्षांपासून सुरु असलेले कामकाज संपूर्ण झाल्यानंतर उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. या उड्डाणपुलावरून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक होते. मात्र आता शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणेही संरक्षित नसल्याचे या रिक्षा चालकाने सांगितले.

गेल्या तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या या उड्डाणपुलाची दुर्दशा पाहून तक्रारींचा महापूर आला आहे. या कामकाजाच्या निकृष्ट दर्जाबाबत नागरिकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

Tags: