पंजाब, उत्तर प्रदेश राज्यात उसाला प्रतिटन 3800 रुपये दराची घोषणा केली आहे. कर्नाटकात मुख्यमंत्र्यांनी त्यापेक्षा 5500 रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेना प्रदेशाध्यक्ष चुनप्पा पुजारी यांनी केली आहे.
उसाला 5500 रुपये प्रति टन भाव जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी नेत्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन पुकारले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी १५ ऑक्टोबरला बेंगळुरू येथे बैठक बोलावल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरा शेतकरी नेत्यांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले. बुधवारी बेळगावात यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना शेतकरी नेते चुनप्पा पुजारी म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. राज्याचे मुख्यमंत्री आणि साखर मंत्र्यांनी बेळगावात येऊन बैठक घ्यावी, अशी मागणी आम्ही केली आहे.

आम आदमी पार्टी आणि बेळगाव वकील संघाच्या नेत्यांनीही आमच्या लढ्याला पाठिंबा दिला. आम्ही आज साखर आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकून मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काल रात्री उशिरा जिल्हाधिकारी बंगळुरूहून आल्यावर आमच्या आंदोलनस्थळी आले आणि तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यानी गुरुवारी बैठक बोलावली आहे, तुम्ही तेथे जाऊन मागण्या मांडा असा आग्रह धरला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी बेळगावात यावे, अशी मागणी आम्ही केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचा टीपी आता ठरलेला नाही, शासनस्तरावर नियोजनबद्धपणे बैठक घेतली जात आहे. तिकडे गेलात तर त्याला किंमत राहील असे सांगितले.
15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत दहा शेतकरी नेते सहभागी होणार असून, उसाला प्रतिटन 5500 रुपये भाव देण्याबाबत सरकारला सविस्तर पटवून देणार आहेत. तसेच कारखाने शेतकऱ्यांवर कसा अन्याय करत आहेत, सरकार आणि कारखानदार गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांना रस्त्यावर का ढकलत आहेत, हे आपण सरकारला पटवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंजाब आणि उत्तर प्रदेश राज्यांमध्ये 3800 रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. त्याहून अधिक 5500 रुपये कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावेत. याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. अन्यथा कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व ऊस उत्पादक सर्व प्रकारचे आंदोलन करण्यास तयार आहेत. आम्ही आज धरणे आंदोलन केले. उद्या सुवर्णसौधसमोर बसू. त्यामुळे 15 तारखेला विकाससौध येथे बैठकीत बोम्मयी यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर द्यावी, अशी मागणी चुनप्पा पुजारी यांनी केली.

आणखी एक शेतकरी नेते गणेश इळीगेर म्हणाले की, सततधार पावसातही आम्ही दिवसरात्र आंदोलन केले. आमच्या संघर्षाला शह देण्यासाठी त्यांनी १५ तारखेला बैठक बोलावली आहे. साखरमंत्र्यांच्या उपस्थितीत भेटून निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आमच्या मागणीवर बैठकीत सखोल चर्चा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे आम्ही आमचे आंदोलन मागे घेतले आहे. अनेक संघटनांनी आमच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सर्वांचे आभार. बंगळुरू येथील बैठकीत काय चर्चा होणार हे पाहिल्यानंतर उत्तर कर्नाटकातील सर्व ऊस उत्पादकांना एकत्र करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
बेळगावच्या शेतकरी नेत्यांच्या आंदोलनापुढे झुकून मुख्यमंत्री बोम्मई उसाचा भाव वाढवणार का..? किंवा ते कारखानदारांच्या लॉबीला बळी पडतील आणि किमतीत थोडी वाढ करून ऊस उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसणार हे पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.


Recent Comments