राज्यातील जनतेने भाजपला जनादेश देऊनदेखील वाम मार्गाने, भ्रष्टाचाराने जे सरकार बनले ते आपल्याच पापाच्या ओझ्याखाली दबले आणि कोसळले अशा शब्दांत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी
कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील बनलेल्या जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारवर सणकून टीका केली. भाजप राज्य कार्यकारिणीला संबोधित करताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, कर्नाटकात भाजपची सत्ता येऊन तीन वर्षे झाली आहेत. केवळ 30-32 जागा मिळालेल्या पक्षाला काँग्रेसने सत्ता दिली. जनादेशाला बगल देत लोकशाहीची कत्तल करत हे सरकार वाम मार्गाने स्थापन झाले. ते सरकार कोसळले कारण ते पापाच्या पायावर उभे होते. त्या दीड वर्षात कर्नाटक सर्वच आघाड्यांवर पिछाडीवर राहिले असे ताशेरे मुख्यमंत्र्यानी कुमारस्वामी सरकारवर ओढले.

नंतर मुख्यमंत्री बोम्मई यांनी तत्कालीन सिद्धरामय्या सरकारवरही हल्लाबोल केला. त्यांच्या काळात राज्यातील जातीय सलोख्याला धोका पोहोचला. कार्यकर्त्यांची गळचेपी होत होती. सर्वत्र भ्रष्टाचार माजला होता. काही विभागात 100% भ्रष्टाचार सुरु होता. लघू पाटबंधारे विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी झाली, पण कुणालाही शिक्षा झाली नाही. त्यांनी एकाच दिवसात 36,000 बोअरवेल खोदले म्हणून सांगून पैसे मिळवले. उशा आणि पलंगातही पैसे मिळवणाऱ्या काँग्रेसला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही, असा पलटवार त्यांनी केला.
एससी आणि एसटी आरक्षण वाढविण्याच्या प्रदेश भाजप कोअर कमिटीच्या निर्णयाला आमचे सरकार कटिबद्ध आहे. भाजप नेहमीच सामाजिक न्यायाच्या बाजूने राहिला आहे. सर्वपक्षीय बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्या श्रेणीतील इतरांनाही न्याय दिला जाईल. त्याचबरोबर अनेक वर्षांपासूनचा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी धाडसी निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली. बाइट
कोअर कमिटीच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि कर्नाटक प्रदेश भाजप प्रभारी अरुण सिंह, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, डी. व्ही. सदानंद गौडा, जगदीश शेट्टर, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, शोभा करंदलाजे आदी आघाडीचे नेते उपस्थित होते.


Recent Comments