म. गांधी जयंतीनिमित्त हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात शिक्षणातून बदल घडविण्यासाठी चेंज फ्रॉम लर्निंग उपक्रम हाती घेण्यात आला होता.
या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रमाचे उद्घाटन वृक्षाला पाणी घालून कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्याहस्ते करण्यात आले. जिल्हाप्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा प्रौढ शिक्षणाधिकारी कार्यालय आणि मध्यवर्ती कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती कारागृह आवारात हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ व्याख्याते बसवराज कुसुगल, आर.एन.पाटील, जिल्हा प्रौढ शिक्षणाधिकारी ए.एम.जयश्री यांची उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार होते.
यावेळी कृष्णकुमार बोलताना म्हणाले, ज्ञान हा जीवनातील आवश्यक घटक असून आपले ज्ञान वाढविण्यासाठी साक्षरतेची गरज आहे. निरक्षर जेव्हा साक्षर होतो त्यावेळी मिळणारा आनंद खूप महत्त्वाचा असतो. कारागृहात आयोजित करण्यात आलेल्या साक्षरता कार्यक्रमात निष्ठेने सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.
यानंतर ए.एम.जयश्री म्हणाल्या की, शिक्षण हे साचलेले पाणी नसून ते वाहत्या नदीसारखे असले पाहिजे.
त्याचप्रमाणे ज्ञान ही खरी संपत्ती आहे जी कोणाकडूनही चोरता येत नाही. त्यामुळे कारागृहात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील या उपक्रमात सर्वांनी मनापासून सहभागी व्हावे. यासाठी विभागाकडून शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ व्याख्याते बसवराज कुसुगल आणि एन आर पाटील यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देत मार्गदर्शन केले. शिक्षणाला वयाचे, स्थळाचे बंधन नसते. शिक्षण कुठेही मिळाले पाहिजे. आयुष्यात घडलेल्या आकस्मिक घटनेची चिंता न करता अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.
२०२१ साली सुरु झालेल्या साक्षरता अभियानातील उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा प्रौढ शिक्षकाधिकारी कार्यालयाचे कार्यक्रम सहायक बी एम पाटील, कारागृहाचे सहायक अधीक्षक शहाबुद्दीन, जेलर बसवराज भजंत्री तसेच भंडारी के जे आदी उपस्थित होते. कारागृहाच्या साक्षरता कार्यक्रमाचे पर्यवेक्षक व शिक्षक शशिकांत यदगुडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आभार मानले.


Recent Comments