Belagavi

बेळगाव स्मार्ट सिटी योजनेचा बोजवारा; १२ शुद्ध पेयजल प्रकल्प बंद

Share

बेळगाव शहराची निवड स्मार्ट सिटी योजनेत झाली, यामुळे जनतेतून सुरुवातीला समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र स्मार्ट सिटी योजनेतील त्रुटींमुळे या योजनेतील अधिकाऱ्यांना जनता शिव्याशाप देत आहे. स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शहरातील १२ विविध ठिकाणी शुद्ध पेयजल प्रकल्प बसविण्यात आले असून गेल्या दोन वर्षांपासून हे प्लांट बंद अवस्थेत आहेत. याकडे अधिकारी वर्गाने केलेल्या दुर्लक्षामुळे जनतेतून संताप व्यक्त होत आहे.

बेळगाव शहर हे स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित होणार यामुळे जनतेतून सुरुवातीला आनंद व्यक्त करण्यात येत होता. मात्र जसजसे या योजनेतील प्रकल्प कार्यान्वित होत गेले तसतशा या प्रकल्पातील त्रुटी समोर येऊ लागल्या आणि जनतेची निराशा झाली. स्मार्ट सिटी अधिकारी आणि मनपा यांच्यात समन्वयाचा असलेला अभाव यामुळे हे कामकाज सुरळीत होत नसल्याचे दिसून येत आहे. याच योजनेतून शहरातील १२ विविध ठिकाणी शुद्ध पेयजल प्रकल्प सुरु करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे प्रकल्प बंद अवस्थेत असून याकडे अधिकारी वर्गाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे जनता संताप व्यक्त करत आहे. याबाबत अधिकारी देखील योग्य उत्तरे देत नसून जनतेच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी झाली असल्याचे उघड झाले आहे.

शुद्ध पेयजल प्रकल्प उभारण्यासाठी ८ ते १० लाख रुपये खर्च होतात. बेळगाव शहरात उभारण्यात आलेले १२ प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे १.२० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे प्रकल्प धूळखात पडले असून देखभाली अभावी झालेली शुद्ध पेयजल प्रकल्पाची दुरवस्था आणि याकडे अधिकारी वर्गाचे झालेले दुर्लक्ष यामुळे जनता अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करत आहे.

यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी म्हणाले, शहरातील १२ शुद्ध पेयजल प्रकल्पांपैकी ३ प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. जुलै महिन्यात सर्व प्रकल्प मनपाकडे सुपूर्द करण्यात आले असून या प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी निविदाही मागविण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. लवकरच या शुद्ध पेयजल प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बिघडलेल्या १२ शुद्ध पेयजल प्रकल्पांच्या देखभालीसाठी मनपाने गिवीन वस्तुम नावाच्या कंपनीला टेंडर दिले असून या कंपनीला मनपा आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. सदर कंपन्यांनी पाण्याचा दर्जा योग्य राखावा, २४ तास सेवा पुरविण्यात यावी, लहान सहान खर्च स्वतः हाताळावेत यासह अनेक सूचना देण्यात आल्या आहेत. एका प्रकल्पासाठी ५४ हजार रुपये खर्च देण्यात येत असून अशा प्रकारे १२ प्रकल्पांची जबाबदारी देण्यात आली आहे. १५ दिवसाच्या आत सर्व प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहेत, अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली.

मागील दोन वर्षांपासून देखभालीविना खराब झालेल्या शुद्ध पेयजल प्रकल्पांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले असून भविष्यात अशाप्रकारे जनतेच्या पैशांची उधळपट्टी होऊ नये याकडे लक्ष देण्याची सूचना नागरीकातून होत आहे.

Tags:

belgaum smart city