राज्य सरकारने कित्तूर विकास प्राधिकरणाला 50 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले असून कित्तूर राणी चेन्नम्मा आणि संगोळ्ळी रायण्णा यांचे पुतळे बेळगाव येथील सुवर्णसौध येथे या वर्षी बसवले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली.
बेळगाव जिल्हा प्रशासन, पर्यटन, कन्नड आणि संस्कृती विभाग यांच्यावतीने रविवारी बेंगळूर येथील रवींद्र कलाक्षेत्र येथे कित्तूर उत्सवानिमित्त आयोजित कित्तूर चन्नम्मा विजय यात्रेचे आज बोम्मई यांनी उदघाटन केले. त्या नंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कित्तूर उत्सवाला 24-25 वर्षे झाली आहेत. सुरू झाल्यावर मध्यंतरी हा उत्सव बंद पडला होता. मात्र भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर हा उत्सव राज्यभर साजरा करण्याचे आदेश जारी करण्यात आले. बेळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री असताना त्यांनी तीन दिवस कित्तूर उत्सव साजरा करण्यासाठी अधिक निधी दिला होता. त्यानंतर, चेन्नम्माचा संदेश असलेली कित्तूर ज्योती कित्तूरहून बेंगळुरूला येत होती, परंतु आता ती राज्याची राजधानी बेंगळुरू येथून सुरू झाली असून, कित्तूर प्रांताची राजधानी कित्तूर येथे जाईल.
बोम्मई म्हणाले की, धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या गॅझेटियरमध्ये कित्तूर राणी चेन्नम्मा यांचा उल्लेख पहिला स्वातंत्र्यलढा सुरू करणारी शूर राणी म्हणून करण्यात आला आहे. त्याची इतिहासात नोंद व्हावी यासाठी ती राष्ट्रीय अभिलेखागाराकडे पाठवली जाईल. कित्तूरमधील विद्यमान परंतु जीर्ण झालेल्या चेन्नम्मा यांच्या राजवाड्याचे बळकटीकरण आणि त्याला लागूनच नवीन राजवाडा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कित्तूरला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. तसेच बैलहोंगल, संगोळ्ळी आदी ऐतिहासिक ठिकाणांचा विकास करण्यात येणार आहे. सरकारने ‘संगोळ्ळी रायण्णा’ या नावाने सैनिक शाळा सुरू केली असून ती पुढील महिन्यात सुरू होणार आहे. याशिवाय रायण्णाला फाशी दिलेले ठिकाण नंदगड विकसित केले जात आहे. बेंगळुरूहून निघालेली विजय ज्योती २३ ऑक्टोबरला कित्तूरला पोहोचेल असे त्यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गोविंद कारजोळ, मंत्री एमटीबी नागराज, साहित्यिक लीलादेवी आर.प्रसाद आदी उपस्थित होते


Recent Comments