Vijayapura

विजापुरात लिंबू उत्पादक शेतकरी अडचणीत अपुऱ्या पाण्यामुळे लिंबूच्या रोपांची वाळवण बाजार तेजीत असूनही शेतकऱ्यांना बसतोय फटका

Share

वातावरणात होत असलेल्या असंख्य बदलांमुळे यंदा प्रत्येक पीक नुकसानीत आले आहे. सध्या उन्हाळी हंगाम असून लिंबाला सर्वाधिक मागणी आहे. यामुळे लिंबूचे भाव जरी वधारले असले तरी लिंबू उत्पादक शेतकऱ्याचे पाण्याविना हाल होत आहेत. लिंबाला पाण्याचा पुरवठा कमी पडत असल्याचे लिंबू रोपटी वळत चालली असून या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी विजापुरातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

राज्यातील सर्वाधिक लिंबूचे उत्पादन हे एकट्या विजापूर जिल्ह्यात घेतले जाते. एकूण २१००० हेक्टर प्रदेशात पिकविला जाणाऱ्या लिंबू उत्पादनापैकी केवळ विजापूरमध्ये १६००० हेक्टर प्रदेशात लिंबू उत्पादन घेतले जाते. प्रामुख्याने विजापुरातील इंडी तालुक्यात सर्वाधिक लिंबू उत्पादन घेतले जाते. मात्र उन्हाचा तडाखा आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे लिंबू उत्पादक तेजीच्या बाजाराचा नफा उचलत असले तरी उत्पन्न क्षेत्रात समस्येला तोंड देत आहेत. पाणीपुरवठा नसल्याने लिंबू रोपटी सुकत चालली आहेत. या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती या भागातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. तांबा या गावातील श्रीमंत बिसानाळ या गावातील शेतकऱ्याने ३०० रोपांची लागवड केली आहे. गेल्या तीन वर्षात निसर्गात होणाऱ्या असंख्य बदलांमुळे आणि पाण्याच्या अभावामुळे लिंबू बागा जळताना पाहाव्या लागत आहेत. भूगर्भ जल पातळी देखील कमी झाली असून लिंबू उत्पादक टँकरद्वारे पाणी पुरवठा करून लिंबू बागा वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. विजापुरात लिंबू उत्पादक महामंडळ देखील कार्यरत आहे. या महामंडळाने प्रथमच लिंबू उत्सवाचे देखील आयोजन केले. मात्र शेतकऱ्यांसमोर उभ्या असलेल्या नैसर्गिक समस्यांमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांच्या या समस्येकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन या समस्येवर तोडगा काढण्याची गरज लिंबू उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत. राज्यातील सर्वाधिक लिंबू उत्पादन करणाऱ्या विजापूरमधील लिंबू उत्पादक मोठ्या संकटात सापडले असून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी व्यक्त होत आहे. शिवाय नुकसान भरपाईचीही मागणी केली जात असून विजापुरात लिंबू उत्पादकांना शासन कधी दिलासा देणार असा सवाल देखील उपस्थित करण्यात येत आहे.

Tags: