Belagavi

येळ्ळूरमध्ये व्यसनमुक्ती जागृती कार्यक्रम, फेरी 

Share

श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीणाभिवृद्धी योजना भिशी ट्रस्टतर्फे महात्मा गांधीजी यांच्या १५२व्या जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती जागृती कार्यक्रम बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथे राबविण्यात आला. यावेळी जागृती फेरीही काढण्यात आली.

श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीणाभिवृद्धी योजना भिशी ट्रस्ट, अखिल कर्नाटक जनजागृती वेदिके ट्रस्ट, बेलतंगडी, कर्नाटक राज्य मद्यपान नियंत्रण मंडळ, जनजागृती वेदिके आणि नवजीवन समिती, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त व्यसनमुक्त समाजासाठी जागृतीपर कार्यक्रम आयोजित केला होता. प्रारंभी गावातील रस्त्यांवरून, व्यसनाचे दुष्परिणाम सांगणाऱ्या घोषवाक्यांचे फलक घेऊन जागृतिफेरी काढण्यात आली. यावेळी फेरीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी मद्यपानासह सर्व व्यसनांच्या दुष्परिणामांची माहिती देणाऱ्या घोषणा दिल्या.

यावेळी बोलताना योजनाधिकारी नागेश एच. म्हणाले, महात्मा गांधीजींनी रामराज्याचे स्वप्न पहिले होते. दारूबंदी हे त्यांचे मुख्य स्वप्न होते. मद्यपानामुळे अनेक कुटुंबांची वाताहत झाली आहे. त्यामुळे मद्यपानमुक्त समाज निर्मितीसाठी डॉ. वीरेंद्र हेग्गडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील १८० तालुक्यात जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

जागृतिफेरीनंतर गावातील सैनिक भवनात जाहीर कार्यक्रम झाला. त्याला देवगणहट्टीचे साधक आश्रमाचे श्री बसुस्वामी महाराज यांचे सानिध्य लाभले. कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा जनजागृती वेदिकेचे माजी अध्यक्ष राजू दोड्डन्नावर यांनी केले. अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्रापंचे अध्यक्ष सतीश पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून एसीपी शरणप्पा, पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर, देवप्पा बागेवाडी, तानाजी हलगेकर, प्रदीप जी. यांच्यासह मान्यवर, धर्मस्थळ संघाचे सदस्य उपस्थित होते.

 

 

Tags: