आमचा परिसर, शहर आणि पर्यायाने देश सुंदर व स्वच्छ ठेवणाऱ्या पौरकार्मिकांना मी हात जोडून नमस्कार करतो. देवाची पूजा करण्यापेक्षाही तुमची पूजा करणे चांगले अशा शब्दांत महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी पौरकार्मिकांच्या कामाची प्रशंसा केली.

होय, पौरकार्मिक नसतील तर खरोखरच आमचे शहर वाचवणे शक्यच झाले नसते. गुरुवारी बेळगावात पौरकर्मीक दिनानिमित्त वार्ड क्र. ४ आणि ५ मधील पौरकार्मिक आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी पौरकार्मिकांचा आणि नूतन नगरसेवकांचा सत्कार केला.
त्यानंतर बोलताना पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी, आम्ही कार्यालयात बसून बरेच मार्गदर्शन करतो. परंतु, वास्तवात जागेवर थांबून खरे काम तुम्ही करता. सण-वारासह कोणत्याही दिवशी रजा न घेता तुम्ही काम करता, कोविड संकटाच्या काळातही सगळे घरी बसले असता, तुम्ही मात्र रस्त्यावर उतरून स्वच्छता राखली. तुमच्या सेवेची आम्ही कितीही प्रशंसा केली तरी ती कमीच आहे असे आयुक्त म्हणाले.
आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी पुढे म्हणाले, पौरकार्मिकांना आरोग्य तपासणी शिबीर, इन्शुरन्स, घरे आदी सर्व सुविधा शासनातर्फे मिळवून देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पौरकार्मिकांना दिला जाणारा ३१०० रु विशेष भत्ता कालच ७ हजार रु पर्यंत वाढविण्यात आला आहे. तुमच्या जर काही वैयक्तिक समस्या असतील तर निःसंकोचपणे मला सांगा, त्या सोडविण्यास मी तत्पर आहे. तुमचे हे सेवाकार्य असेच पुढे सुरु राहू द्या असे आवाहन त्यांनी पौरकार्मिकांना केले.
याप्रसंगी नगरसेवक संतोष पेडणेकर, जयतीर्थ सवदत्ती, पालिका आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ, पर्यावरण अधिकारी हणमंत कलादगी, आदिलखान पठाण, आरोग्य निरीक्षक संतोष कुरबेट यांच्यासह पालिका अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments