: कोविडच्या नावावरून गणेशोत्सवासह हिंदूंच्या सणांवर बंदी घालण्याच्या आणि लव्ह जिहाद प्रकरणी कारवाई न करण्याच्या सरकारच्या धोरणावर श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी तीव्र टीका केली आहे.

बेळगावात बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना प्रमोद मुतालिक म्हणाले, सरकारने गणेशोत्सवावर निर्बंध घालण्याचा विचार सोडून द्यावा. केवळ हिंदूंच्या सणांवरच निर्बंध का? मोहरमवर निर्बंध का घातले नाहीत? कोविडच्या नावाखाली उत्सवांवर निर्बंध अंत,मग शाळा-कॉलेज, हॉटेल्स का सुरु करताहात? गणेशोत्सवाच्या निर्बंधांना आमचा विरोध असेल. त्याच्या निषेधार्थ येत्या २१ ऑगस्टला राज्यभरात श्रीराम सेनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असताना शाळा-कॉलेज सुरु करून मुलांचा बळी द्यायला सरकार निघाले आहे. मनपा निवडणुकांना कोरोनाची भीती नाही. एवढेच काय पण सत्ताधारी भाजपच्या जनादेश यात्रेलाही कोरोनाची भीती नाही. मग गणेशोत्सवाला कसली भीती? असा प्रश्न करून हिंदूंच्या नावाने सत्तेवर आलेल्या भाजप सरकारची कोण दिशाभूल करतेय असा सवाल मुतालिक यांनी केला. बेळगावात लव्ह जिहादच्या घटना घडत असूनही पोलीस कारवाई करण्यास कचरत आहेत. बेळगावातील नौशादनामक युवकाने निर्मलकुमार नावाने बनावट फेसबुक आयडी तयार करून कोलकाता येथील हिंदू युवतीची फसवणूक केली. त्याबाबत युवतीने मार्केट पोलीस ठाण्यात तक्रार देऊन ३ महिने झाले तरीही मार्केट पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही. त्या मुस्लिम युवकाला अजून अटक का केली नाही. आधी त्याचा ढाबा बंद करा अशी मागणी मुतालिक यांनी केली.
गदग येथील मुस्लिम युवकाकडून १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. माळमारुती पोलिसात तक्रार देऊनही अद्याप नोंदणी करण्यात आली नाही. बेळगावात कोलकात्यामधील हिंदू महिलेची फसवणूक करण्यात आली. हारुगेरी येथे हिंदू बालिकेची हत्या करण्यात आली. या घटनांवरून बेळगावात हिंदू महिला सुरक्षित नाहीत हेच सिद्ध होते. याबाबत आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन देऊ असे त्यांनी सांगितले.
अफगाणिस्तानमधील भारतीयांना आसरा देण्याबाबत मुतालिक म्हणाले, पीडितांच्या नावाखाली अफगाणी मुस्लिमांना आसरा देऊ नये. बांगला देशात रोहिंग्या मुस्लिमांमुळे समस्या निर्माण झाली आहे. तशी स्थिती येथे निर्माण होऊ नये याची केंद्र सरकारने खबरदारी घ्यावी असे आवाहन केले. एकंदर, हिंदूंच्या सणांवर निर्बंध, लव्ह जिहादबाबत मवाळ धोरण यावरून प्रमोद मुतालिक यांनी सरकारला रोखठोक सवाल केले आहेत.


Recent Comments