बळ्ळारी येथे लक्ष्मीपूजेच्या नावाखाली गरीब तरुणींना आमिष दाखवून नग्न पूजा करण्यास भाग पाडत त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुजारी कम्मार कृष्णमाचारी याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १५ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती बळ्ळारीचे पोलीस अधीक्षक डॉ. सुमन पन्नेकर यांनी दिली.
१० नोव्हेंबर रोजी बळ्ळारीच्या एपीएमसी पोलीस ठाण्यात वेश्याव्यवसाय आणि लैंगिक शोषणाच्या जाळ्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी कम्मार कृष्णमाचारी याला पोलिसांनी अटक केली आहे. तो आंध्र प्रदेशातील अनंतपूरजवळील आकतोटपल्ली येथील महाकाली मंदिरात पुजारी होता. पैशांचे आमिष दाखवून गरीब तरुणी आणि महिलांना लक्ष्मीपूजेच्या नावाखाली फसवून नग्न पूजा करण्यास भाग पाडत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यानंतर त्यांचे नग्न फोटो आणि व्हिडिओ चित्रीत करून त्याद्वारे ब्लॅकमेल करत फसवणूक केली जात होती. एपीएमसी पोलीस ठाण्याचे पथक आणि ‘अक्क पथका’ने केलेल्या कारवाईत हे प्रकरण उघडकीस आले.

प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपी शबरीमला, विजयवाडा आणि तिरुपती येथे लपून राहत होता. मोबाईल टॉवर लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढला. बसमधून आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे जात असताना त्याला अटक करण्यात आली. सध्या आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून, पुढील चौकशीसाठी त्याला पोलीस कोठडीत घेण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. सुमन पन्नेकर यांनी सांगितले.
या प्रकरणात मुख्य आरोपीसह आतापर्यंत एकूण १५ जणांना अटक करण्यात आली आहे. या जाळ्याचे आंतरराज्यीय संबंध आणि अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आल्याची माहितीही पोलीस अधीक्षकांनी दिली.


Recent Comments