माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यविषयक समस्यांवर चर्चा तसेच आधुनिक उपचारपद्धतींची माहिती देण्यासाठी बेळगावात २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय प्रसूती व स्त्रीरोग वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केएलईचे कुलगुरू डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी दिली.
भारतीय प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनांचे महासंघ, बेळगाव प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना आणि केएएचईआरच्या जेएनएमसीमधील प्रसूती व स्त्रीरोग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जेएनएमसीच्या केएलई शताब्दी केंद्रात ही परिषद होणार आहे. गुरुवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या परिषदेत अमेरिका, इंग्लंड, इस्रायल आणि कोलंबिया येथील वैद्यकीय शास्त्रज्ञ व संशोधक सहभागी होणार आहेत. त्यांच्यासह देशातील विविध राज्यांतील प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ माता आणि नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त संशोधन निष्कर्ष व आधुनिक उपचारपद्धतींवर मार्गदर्शन करणार आहेत.
गर्भावस्थेदरम्यान आणि प्रसूतीनंतर उद्भवणारा रक्तक्षय, गर्भवतींमधील उच्च रक्तदाब व प्री-एक्लॅम्प्सिया, प्रसूतीनंतर होणारा अतिरक्तस्राव, मुदतपूर्व प्रसूती, गर्भातील बाळाची खुंटलेली वाढ, गर्भावस्थेतील मधुमेह आणि मातांमध्ये आढळणारा सेप्सिस या सात प्रमुख आरोग्य समस्यांवर परिषदेत शास्त्रीय चर्चा होणार आहे.
या समस्यांचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान, योग्य उपचार आणि माता व बालकांचे प्राण वाचविण्यासाठी आवश्यक आधुनिक वैद्यकीय उपाययोजनांवर तज्ज्ञ विचारविनिमय करणार आहेत. वैद्यकीय संशोधनातून मिळालेले निष्कर्ष प्रत्यक्ष उपचारपद्धतीत वापरणे हा परिषदेचा प्रमुख उद्देश असल्याचे डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितले.
या परिषदेला एफओजीएसआयचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भास्कर पाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, केएएचईआरचे मानद कुलपती पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. राजस्थान सरकारच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त अभियान संचालिका डॉ. टी. शुभमंगला, कर्नाटक सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाच्या माता आरोग्य विभागाच्या उपसंचालिका डॉ. इंदिरा कबाडे, केएएचईआरचे कुलगुरू डॉ. संदीप श्रीवास्तव, कुलसचिव डॉ. विश्वनाथ पट्टणशेट्टी आणि जेएनएमसीचे प्राचार्य डॉ. राजेश पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी डॉ. व्ही. एम. पट्टणशेट्टी, एम. सी. मेटगुड, डॉ. राजश्री यांच्यासह अन्य उपस्थित होते.


Recent Comments