विजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भूतनाळ तलावातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाल्याने पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. यापुढे शहरातील सर्व ३५ प्रभागांना सुमारे आठ दिवसांच्या अंतराने पिण्याचे पाणी पुरविण्याचा निर्णय कर्नाटक जलमंडळ आणि महानगरपालिकेने घेतला आहे.
भूतनाळ तलावावर अवलंबून असलेल्या भागांना कोळार कृष्णा नदीतून पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, पाण्याची उपलब्धता कमी असल्याने यापूर्वी निश्चित केलेल्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकातील अंतर वाढविण्यात येणार आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती जलमंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी, झाडांना पाणी घालण्यासाठी, रस्ते धुण्यासाठी किंवा विनाकारण गटारात पाणी सोडण्यासाठी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय होताना आढळल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता नळजोडणी तोडण्यात येईल आणि संबंधितांना दंडही आकारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.


Recent Comments