Bellary

व्याजाच्या पैशांसाठी मित्राची हत्या करून मृतदेह जाळला; चौघांना अटक

Share

बळ्ळारी जिल्ह्यात आर्थिक व्यवहारातून मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीचा तपास करताना हत्येचा प्रकार समोर आला असून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

बळ्ळारी जिल्ह्यातील सिरुगुप्पा तालुक्यातील तेक्कलकोटे येथे ही घटना घडली. हनुमंतप्पा यांची २९ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी एस. लक्ष्मी यांनी तेक्कलकोटे पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना हत्येचा उलगडा झाला. एक लाख रुपयांच्या व्याजाच्या व्यवहारातून हनुमंतप्पा यांचे मित्र उपेंद्र, शशिकुमार, मल्लिकार्जुन आणि गंगाधर या चौघांनी मिळून त्यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपींनी हनुमंतप्पा यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळला. अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे तुकडे करून ते तलाव आणि कालव्यात फेकल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. आरोपी पेट्रोल पंपावरून पेट्रोल खरेदी करत असल्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, मृतदेहाचे अवशेष शोधण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, हनुमंतप्पा यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह लवकर शोधून आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.

Tags: