धारवाडमधील योगेश गौडा हत्या प्रकरणात माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द करत १४ दिवसांत कारागृह प्रशासनासमोर हजर होण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. निकाल जाहीर होताच विनय कुलकर्णी यांच्या निवासस्थानी राजकीय आणि कायदेशीर हालचालींना वेग आला.
योगेश गौडा हत्या प्रकरणात लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने विनय कुलकर्णी यांच्यासह आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देत विनय कुलकर्णी यांना जामीन मंजूर केला होता. या निर्णयाला सीबीआय आणि योगेश गौडा यांचे बंधू गुरुनाथ गौडा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने ही याचिका मान्य करत उच्च न्यायालयाचा जामीन मंजूर करण्याचा आदेश रद्द केला. तसेच विनय कुलकर्णी यांच्यासह या प्रकरणातील १२ आरोपींना पुढील १४ दिवसांत कारागृह प्रशासनासमोर हजर होण्याचे निर्देश दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षेला देण्यात आलेली स्थगितीही उठली आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षेच्या पार्श्वभूमीवर विनय कुलकर्णी यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होताच विनय कुलकर्णी डायरी येथून डिफेंडर गाडीतून थेट आपल्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी ते तणावात असल्याचे दिसून आले. निकालाची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. मात्र, कुटुंबीयांनी सध्या कोणालाही भेटण्याची परवानगी दिलेली नाही.
गेल्या अर्ध्या तासापासून विनय कुलकर्णी आपल्या वकिलांशी बंद दाराआड सविस्तर चर्चा करत असून, पुढील कायदेशीर लढ्याची रणनीती ठरवत असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयातील दिलासा मिळण्याचा मार्ग बंद झाल्यानंतर, उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या अपीलावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करून दिलासा मिळवणे, हा त्यांच्यासमोरील पर्याय असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.


Recent Comments