गृहपाठ केला नाही, या कारणावरून दुसरीच्या विद्यार्थ्याला दोन शिक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप समोर आला आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर जमखंडी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना बागलकोट जिल्ह्यातील रबकवी-बनहट्टी तालुक्यातील राणी चन्नम्मा प्राथमिक शाळेत घडल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेतील दुसरीत शिकणाऱ्या श्रेयस आसंगी याने गृहपाठ केला नसल्याच्या कारणावरून शिक्षिका विजयलक्ष्मी आणि मुख्याध्यापक अंबी यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या हात-पायांवर व्रण उमटले असून त्याला तीव्र तापही आला. त्यामुळे त्याला जमखंडी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बनहट्टी पोलीस ठाण्यात विद्यार्थी आणि पालकांनी तक्रार दिली आहे.

विद्यार्थ्याच्या अंगावर व्रण उमटतील आणि रक्त गोठेल अशा पद्धतीने मारहाण झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. पोलिसांनी विद्यार्थ्याकडूनही घटनेची माहिती घेतली असून, दोषी शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. घटना घडून एक दिवस उलटूनही शिक्षण विभाग आणि बाल संरक्षण विभागाचे अधिकारी विद्यार्थ्याची विचारपूस करण्यासाठी आले नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गृहपाठ केला नाही म्हणून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.


Recent Comments