Belagavi

पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरेंकडून नारायण गौडांचा उदो उदो! म्हणाले….!

Share

बेळगावातील जीरगे सभागृहात तंबुरी लोककला कन्नड पथकातर्फे आयोजित ‘कन्नडवे सत्य, कन्नडवे नित्य’ कार्यक्रमात ३२ मान्यवरांना ‘कर्नाटक सार्वभौम’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केएलई संस्थेचे गौरव कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी उत्तर कर्नाटकाला न्याय मिळवून देण्यासाठी टी. ए. नारायण गौडा यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. प्रभाकर कोरे यांनी सत्काराला उत्तर देताना, कन्नडिगांच्या मनात नारायण गौडा यांचे स्थान मुख्यमंत्र्यांपेक्षाही मोठे असल्याचे सांगितले. नारायण गौडा यांनी आवाज उठविल्यास सरकारही हादरते. कोणताही मुख्यमंत्री असला तरी नारायण गौडा समोर आल्यास त्यांना उठून उभे राहावे लागते, असे ते म्हणाले. नारायण गौडा यांनी केलेल्या सत्कारामुळे संपूर्ण उत्तर कर्नाटकातील जनतेचा सन्मान झाल्याचा आनंद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. बेळगाव हे कर्नाटकाचे अविभाज्य अंग असून, कोणालाही शहराची एकता डळमळीत करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बंगळुरूमध्ये कन्नड भाषेच्या संवर्धनाला प्राधान्य देण्याची गरज असून, आयटी कंपन्यांमध्ये कन्नडिगांवर अन्याय होऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.

आमदार आसिफ सेठ यांनी नारायण गौडा यांच्या कन्नड भाषेच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण लढ्याचे कौतुक केले. गेल्या ३० ते ४० वर्षांपासून घर-संपत्तीचा विचार न करता त्यांनी कर्नाटक आणि कन्नड भाषेच्या रक्षणासाठी संघर्ष केला आहे. राज्य आणि भाषा यांच्या प्रगतीसाठी त्यांच्यात प्रबळ इच्छाशक्ती असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी काही महिन्यांपूर्वी नारायण गौडा यांना कोणत्याही पक्षातून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विधानसभेत येण्याचे आवाहन केल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टिहोळी यांनी कर्नाटक रक्षण वेदिका केवळ भाषेसाठीच नव्हे, तर न्यायासाठीही संघर्ष करत असल्याचे सांगितले. भाषा, भूमी आणि जल यांच्या संरक्षणासाठी सर्वांनी संघटनेच्या कार्यात सहभागी व्हावे. बंगळुरूमध्ये करवेच्या केंद्रीय कार्यालयाच्या उभारणीसाठी निधी संकलनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

करवेचे राज्याध्यक्ष टी. ए. नारायण गौडा यांनी राज्यातील रोजगाराच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली. पदवीधर लाखो कन्नडिग तरुण रोजगारासाठी परराज्यांत आणि परदेशांत स्थलांतर करत असताना बंगळुरूसारख्या शहरांत परराज्यांतून आलेल्यांना अधिक रोजगाराच्या संधी मिळत आहेत. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी संघर्ष करावा लागत आहे, असे ते म्हणाले. राज्यात उद्योग उभारणाऱ्यांनी स्थानिक कन्नडिगांना रोजगार देऊन भूमीचे ऋण फेडावे. आयटी-बीटी कंपन्यांनी कन्नड तरुणांना नोकरीत प्राधान्य द्यावे. उद्योजकांच्या नफ्यात वाटा मागत नसून काम करण्याची संधी मागत आहोत, हा कन्नडिगांचा हक्क आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, डॉ. प्रभाकर कोरे यांनी नारायण गौडा यांची केलेली स्तुती आणि त्यांना मुख्यमंत्र्यांपेक्षाही मोठे स्थान देणारे वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. सीमाभागात सातत्याने तणाव निर्माण करण्याचे काम नारायण गौडा यांच्याकडून होत असताना, त्यांच्या भूमिकेचीच री ओढत कोरे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यावेळी हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी आणि नागनूर रुद्राक्षी मठाचे अल्लमप्रभू स्वामीजी यांची उपस्थिती होती. उपमहापौर हनुमंत कोंगाली, डीसीसी बँकेचे संचालक राहुल जारकिहोळी, करवेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगणट्टी, राज्य संयोजक सुरेश गवन्नवर आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष दीपक गुडगणट्टी यांनी स्वागत केले.

Tags: