जपानमधील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी टोयोटाच्या मोतोमाची प्रकल्पाला भेट देऊन कंपनीच्या प्रमुखांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी जपानमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या कर्नाटकातील आयटीआय प्रशिक्षणार्थींशीही संवाद साधला.

राज्य सरकारच्या गुंतवणूक आकर्षण मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी अवजड व मध्यम उद्योग, पायाभूत सुविधा विकास आणि वाणिज्य मंत्री एम. बी. पाटील यांच्यासह शिष्टमंडळाच्या उपस्थितीत टोयोटा मोटर कॉर्पोरेशनच्या प्रमुखांशी गुंतवणुकीबाबत चर्चा केली.


यावेळी टोयोटाच्या ‘ग्लोबल स्किल-अप’ कार्यक्रमांतर्गत जपानमध्ये विशेष प्रशिक्षण घेत असलेल्या टोयोटाच्या बिदडी प्रकल्पातील २० हून अधिक आयटीआय प्रशिक्षणार्थींशी त्यांनी संवाद साधला.

प्रशिक्षणार्थींकडून त्यांच्या अनुभवांची माहिती घेत मुख्यमंत्र्यांनी जपानमध्ये मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन तांत्रिक कौशल्य आणि प्रावीण्य वाढवावे, तसेच कर्नाटकाच्या विकासात योगदान द्यावे, असे प्रोत्साहन दिले.
कर्नाटकात नवीन गुंतवणूक आकर्षित करणे, राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि थेट परकीय गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र म्हणून राज्याचे स्थान अधिक मजबूत करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला.
‘बियॉन्ड बंगळुरू’ उपक्रमाच्या माध्यमातून औद्योगिक विकास, गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी बंगळुरूबाहेरील भागांतही विस्तारण्यास सरकार कटिबद्ध आहे. राज्याच्या सर्व भागांत संतुलित औद्योगिक विकास साधण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
उद्योगांना आकर्षित करून रोजगारनिर्मिती करणे आणि बंगळुरूबाहेरील आर्थिक संधींचा विस्तार करून कर्नाटकातील प्रत्येक भागाला राज्याच्या विकासप्रक्रियेत सहभागी करून घेणे, हे सरकारच्या गुंतवणूक मोहिमेचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments