राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी रिक्त असलेले एक मंत्रिपद भरण्यासाठी काँग्रेस हायकमांडच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा असून, बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डी. के. शिवकुमार यांनी जूनमध्ये मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ३३ सदस्यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याने विरोधकांसह स्वपक्षातील नेत्यांनीही टीका केली होती. त्यामुळे अधिवेशनापूर्वी महिला आमदाराला मंत्रिपद देण्यास मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार अनुकूल असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या आणि उत्तर कर्नाटकात मजबूत संघटनात्मक ताकद असलेल्या माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी ते हायकमांडवर दबाव आणत असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळातील जातीय समीकरणांचा विचार करून वेगळी भूमिका घेतल्याचे समजते. मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याऐवजी कुरुब समाजातील नेत्याला मंत्रिपद द्यावे, असा आग्रह त्यांनी हायकमांडकडे धरल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
ऑगस्टमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ पुनर्रचनेत महिला व बालकल्याण खाते गमावलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार की सिद्धरामय्या यांच्या भूमिकेला हायकमांड पसंती देणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.


Recent Comments