Kagawad

ज्योतीकुमार पाटील यांची सौंदत्ती रेणुका देवी मंदिर विकास समितीवर नियुक्ती

Share

लायन्स क्लबच्या माध्यमातून उगार शाखा गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात सामाजिक कार्य करत आहे. या कार्याची दखल घेत झोनल चेअरमन डॉ. अशोक मुरगोड यांनी क्लबच्या उपक्रमांचे कौतुक केले.

शुक्रवारी सायंकाळी डॉ. अशोक मुरगोड यांनी उगार लायन्स क्लबला भेट देऊन शाखेच्या प्रगतीचा आणि उपक्रमांचा आढावा घेतला. उगारचे दिवंगत साखर उद्योजक राजाभाऊ शिरगावकर यांनी या शाखेची स्थापना केली होती. राज्य सरकारने क्लबचे माजी अध्यक्ष ज्योतकुमार पाटील यांची सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी मंदिर विकास प्राधिकरणाच्या संचालकपदी नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. मोहन कटगेरी यांनी स्वागत करून क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. सचिव पंडित आनंद कुंभार यांनी गेल्या सहा महिन्यांत राबविलेल्या विकासकामांचा आणि लोकहिताच्या योजनांचा आढावा मांडला.

राज्य सरकारने ज्योतकुमार पाटील यांची श्री रेणुका यल्लम्मा मंदिर विकास समितीच्या संचालकपदी नियुक्ती केल्याबद्दल क्लबच्या सदस्यांनी त्यांचा सन्मान केला. तसेच नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.

सन्मानाला उत्तर देताना ज्योतकुमार पाटील म्हणाले की, राज्य सरकारने विश्वासाने ही जबाबदारी सोपवली आहे. श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून भाविक येतात. मंदिराच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून सुमारे ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तिरुपती मंदिराच्या धर्तीवर सौंदत्ती क्षेत्राचा विकास करण्याची सरकारची योजना असून, ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सूचना आणि सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाला गोकाक लायन्स क्लबचे अध्यक्ष शंकर दोडमनी, उगार क्लबचे उपाध्यक्ष पी. बी. कुलकर्णी, राजेंद्र पोतदार, पायाप्पा कुडवकलगी, डॉ. बी. ए. पाटील, बी. एन. जोगुळे, मनोज मालगत्ते, डॉ. एस. बी. साबडे, राहुल शहा, मनीष शहा, डॉ. बाबागौडा पाटील, महादेव दानण्णवर, बी. बी. कागे, सुभाष हेब्बळी, एस. बी. भट आणि सचिन पोतदार यांच्यासह क्लबचे सदस्य उपस्थित होते.

Tags: