Athani

अथणी स्वतंत्र जिल्ह्याच्या निर्मितीचे लक्ष्मण सवदींचे संकेत; अधिवेशनानंतर निर्णयाची शक्यता

Share

राज्यातील सर्वात मोठ्या बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, अथणीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी पुढे आली आहे. बेळगाव अधिवेशनानंतर अथणी जिल्ह्याची निर्मिती करण्याबाबत सहकारमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिलेल्या संकेतांमुळे जिल्हा विभाजनाच्या चर्चेला नव्याने चालना मिळाली आहे.

अथणी येथे बोलताना माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी १५ तालुके आणि १८ विधानसभा मतदारसंघ असलेल्या बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्याची गरज व्यक्त केली. अथणी येथे यापूर्वीच आरटीओ कार्यालय सुरू करण्यात आले असून, जिल्हा निर्मितीनंतर स्वतंत्र मध्यवर्ती सहकारी बँकेचीही स्थापना करावी, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा विभाजनाच्या मागणीवर सरकारने गांभीर्याने निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. अथणी, कागवाड, रायबाग आणि कुडची या चार विधानसभा मतदारसंघांसह आणखी दोन मतदारसंघांचा समावेश करून नवीन जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्तावही मांडला.

मात्र, स्वतंत्र जिल्ह्याच्या मागणीसाठी चिक्कोडी, गोकाक आणि बैलहोंगल येथूनही पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्याचे विभाजन नेमके कसे करायचे आणि कोणत्या भागाला जिल्ह्याचा दर्जा द्यायचा, याबाबत पेच निर्माण झाला आहे. तीन वेगवेगळ्या भागांतून जिल्हानिर्मितीची मागणी होत असल्याने सरकारसमोर आव्हान उभे राहिले आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अथणी जिल्ह्याबाबत पुढे आलेल्या या भूमिकेमुळे बेळगाव जिल्हा विभाजनाचा विषय पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

Tags: