Belagavi

तानाजी गल्लीतील गटाराची सहा महिन्यांपासून दुरवस्था; नागरिकांच्या हालअपेष्टा

Share

बेळगावच्या तानाजी गल्ली ब्रिज कॉर्नर परिसरात कोसळलेल्या गटाराच्या दुरुस्तीचा प्रश्न सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने काम करण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

ओल्ड पी. बी. रोडवरील या गटारातून न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, चव्हाण गल्ली आणि कामत गल्ली परिसरातील सांडपाणी वाहून नेले जाते. तानाजी गल्लीतून येणारे छोटे गटारही याच मुख्य गटाराला जोडलेले आहे. दोन्ही गटारांची बांधकामे कोसळल्याने सांडपाण्याचा प्रवाह अडला असून, निचऱ्याची व्यवस्था विस्कळीत झाली आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांना अस्वच्छ वातावरणात वावरावे लागत आहे.

गटाराच्या शेजारीच सार्वजनिक विहीर असल्याने पाणी भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दुसरीकडे, जवळच्या दुकानांच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठीही अडथळे निर्माण झाले आहेत. महानगरपालिकेने लावलेल्या पत्र्यांमुळे दुकानदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, सहा महिन्यांपूर्वी पाहणीसाठी आलेल्या अभियंत्यांनी दोन दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासनानंतरही काम झाले नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

महानगरपालिका कर वसुलीसाठी तत्पर असते, मग नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडवताना ही तत्परता का दिसत नाही, असा सवाल स्थानिकांनी केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन दोन्ही गटारांची दुरुस्ती पूर्ण करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा महानगरपालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Tags: