Vijayapura

आलमट्टीच्या बॅकवॉटरमध्ये पुण्यस्नानासाठी भाविकांची गर्दी

Share

विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी तालुक्यातील आलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पुण्यस्नानासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली.

शेजारील बागलकोट जिल्ह्यातील गद्दनकेरी दुर्गादेवी यात्रेसाठी आलेल्या हजारो भाविकांनी यात्रेनंतर आलमट्टी येथे भेट देत कृष्णा नदीच्या बॅकवॉटरमध्ये पुण्यस्नान केले. शेकडो वाहनांतून भाविक दाखल झाले होते. नदीत स्नान करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

मात्र, भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोणत्याही ठोस सुरक्षा उपाययोजना नसताना भाविक नदीत उतरून स्नान करत असल्याचे दिसून आले. नदीची खोली आणि पाण्याच्या प्रवाहाची माहिती नसतानाही लोक पाण्यात उतरत असल्याने स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

दुसरीकडे, भाविकांच्या वाहनांमुळे गद्दनकेरी ते आलमट्टी धरणापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. गद्दनकेरी-बागलकोट-शिरूर-होसूर-आलमट्टी मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. एकाच वेळी शेकडो वाहने या मार्गावर आल्याने अन्य वाहनचालकांसह कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला. वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेकांना इच्छितस्थळी पोहोचण्यास विलंब झाला.

भाविकांची गर्दी लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त होत आहे.

Tags: