विजयनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर वाहनांच्या धडकेत वन्यप्राण्यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. यंदा तीन बिबट्यांसह एका अस्वलाचा मृत्यू झाला आहे.

महामार्ग प्राधिकरणाच्या कामातील त्रुटी आणि वाहनांचा वेग यामुळे वन्यप्राण्यांसह मानवी जीवांनाही धोका निर्माण झाला आहे. वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या भागात सावधानतेचे फलक लावूनही वाहनचालकांकडून दुर्लक्ष होत असल्याने अपघातांच्या घटना घडत आहेत.

पहाटेच्या वेळी अन्न आणि पाण्याच्या शोधात वन्यप्राणी महामार्ग ओलांडताना वेगवान वाहनांच्या धडकेत मृत्युमुखी पडत आहेत. वन्यप्राण्यांना सुरक्षितपणे महामार्ग ओलांडता यावा, यासाठी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग उभारण्याची मागणी वनविभागाने केली आहे.
वनक्षेत्रालगतच्या रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन विजयनगरच्या उपवनसंरक्षक अनुपमा एच. यांनी केले आहे.


Recent Comments