बेळगाव येथील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेत बालदिनानिमित्त नवीन सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले.
आमदार आसिफ सेठ यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या सभागृहाचे उद्घाटन आमदार आसिफ सेठ आणि अमान आसिफ सेठ यांच्या हस्ते करण्यात आले.


विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. बेळगाव जिल्हा अंध सेवा संस्थेचे मानद सचिव श्रीनिवास शिवनिगौडा यांनी स्वागत व प्रास्ताविक करून मान्यवरांची ओळख करून दिली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले.

यानंतर मान्यवरांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी चाचा नेहरू यांच्यावरील गीत सादर केले. दहावीतील विद्यार्थिनी कु. साक्षी मल्ल पाटील हिने नेहरूंचे जीवन आणि विचारांवर भाषण केले.

यावेळी देणगीदार शोभा जोशी यांचा सत्कार करण्यात आला. आमदार आसिफ सेठ यांनी शाळेच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण प्रगतीचे कौतुक केले. अमान आसिफ सेठ यांनी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेऊन उच्च ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित केले.

संस्थेचे अध्यक्ष चिंतामणी ग्रामोपाध्ये यांनी अध्यक्षीय भाषण केले. मुख्याध्यापिका अनिता गावडे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांच्या शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. शिल्पा कुसलापूर यांनी सूत्रसंचालन केले. नवीन सभागृहामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.


Recent Comments