नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात बेळगावचे जयवंत हम्मण्णावर सहभागी झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रतिष्ठित सोहळ्यात बेळगावमधील बसवन कुडची येथील रहिवासी आणि पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाचे (PCI) सरचिटणीस जयवंत गुंडू हम्मण्णावर यांनी सन्माननीय अतिथी म्हणून सहभाग घेतला. यावेळी पीसीआयचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया आणि जयवंत हम्मण्णावर यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

या सोहळ्यात पॅरा खेळाडू रुद्रांश खंडेलवाल आणि एकता भयान यांना अर्जुन पुरस्कार, तर स्कालझांग रिगझिन यांना तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
देशाच्या प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कार सोहळ्यात महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडण्याची संधी बेळगावच्या सुपुत्राला मिळाल्याने जिल्ह्यातील क्रीडा संघटना आणि नागरिकांकडून जयवंत हम्मण्णावर यांचे अभिनंदन होत आहे.


Recent Comments