पत्रकारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन करण्याचा निर्णय कर्नाटक कार्यरत पत्रकार ध्वनी संघटनेने घेतला आहे. यासंदर्भात बैलहोंगल येथे पूर्वतयारी बैठक झाली.

कर्नाटक कार्यरत पत्रकार ध्वनी संघटनेचा राज्यभर विस्तार करण्याच्या उद्देशाने आयोजित बैठकीत नवीन सदस्यांचा समावेश आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. बैलहोंगल तालुका अध्यक्षपदी शिवू जोळद यांची निवड करण्यात आली. संघटनेचे राज्याध्यक्ष मल्लिकार्जुन बंगळे यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली. नूतन अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या अन्य पदांवरही नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

पत्रकारांना बस पास, आरोग्य सुविधा आणि पत्रकार संरक्षण कायदा लागू करणे यांसह विविध मागण्या आगामी हिवाळी अधिवेशनात सरकारसमोर मांडण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या मागण्यांसाठी सुवर्णसौधसमोर आंदोलन करण्याचेही ठरविण्यात आले.
राज्यातील अनेक पत्रकार विविध समस्यांना सामोरे जात असून, सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा सर्व पत्रकारांपर्यंत पोहोचत नसल्याचे राज्याध्यक्ष मल्लिकार्जुन बंगळे यांनी सांगितले. बस पास, आरोग्य सुविधा आणि पत्रकार संरक्षण कायद्याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करावा. गेल्या तीन वर्षांपासून सुवर्णसौधसमोर सातत्याने आंदोलन सुरू असून, या लढ्यामुळे सरकारने पत्रकारांसाठी बस पास सुविधा सुरू केली आहे. मात्र, अद्याप अनेक पत्रकारांना या सुविधेचा लाभ मिळालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
संघटनेतील सर्व पत्रकार आपल्या मागण्यांचे निवेदन रक्ताने लिहून स्थानिक आमदार, खासदार आणि मंत्र्यांना सादर करणार आहेत. पत्रकारांनाही कामगार कायदे लागू करावेत, अशी मागणी करण्यात येणार आहे. सरकारने पत्रकारांच्या समस्यांकडे लक्ष न दिल्यास आगामी काळात राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मल्लिकार्जुन बंगळे यांनी दिला.
शानूल मत्तेखान बैलहोंगल.


Recent Comments