बेळगाव शहराच्या स्वच्छता आणि सर्वांगीण विकासासाठी ७५ कोटी रुपयांची ‘सिटिस २.०’ योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.

बेळगाव स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या ‘सिटिस २.०’ योजनेबाबत महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, उत्तरचे आमदार आसिफ सेठ आणि दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी महापालिकेतील कचरा व्यवस्थापन, कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, ट्रान्स्फर स्टेशन आणि बायोगॅस प्रकल्पांची उभारणी यांसह शहराच्या स्वच्छतेशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


बैठकीनंतर बोलताना दक्षिणचे आमदार अभय पाटील म्हणाले, बेळगावच्या विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आले आहेत. ‘सिटिस २.०’ योजनेतील फायदे-तोटे तसेच त्रुटींबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. योजनेची संपूर्ण माहिती आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत सादर करण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. केंद्र सरकारचा ४० टक्के, राज्य सरकारचा ४० टक्के आणि महापालिकेचा २० टक्के निधी अशा एकूण ७५ कोटी रुपयांच्या खर्चातून ही योजना तयार करण्यात आली आहे. येत्या सोमवारी तांत्रिक समितीसमोर मंजुरीसाठी ती सादर केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तरचे आमदार आसिफ सेठ म्हणाले, शहराची स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य या दृष्टीने ७५ कोटी रुपयांची ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योजनेवर चर्चा करण्यात आली असून, मंजुरी मिळताच तिच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला सत्ताधारी गटाचे नेते संतोष पेडणेकर, स्थायी समितीच्या अध्यक्षा सारिका पाटील, महापालिका आयुक्त कार्तिक एम., उपायुक्त लक्ष्मी निप्पाणिकर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments