खानापूर शहरातील बहार गल्ली जवळील आश्रय कॉलनीत गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. घराचे कुलूप तोडून आत शिरलेल्या चोरट्यांनी लाखो रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करून पळ काढला.
खानापूर शहरातील आश्रय कॉलनीतील राजू भोसले यांच्या दुमजली घरात ही चोरी झाली आहे. घराच्या तळमजल्यावर राहणाऱ्या राजू भोसले यांच्या आई घराला कुलूप लावून गावी गेल्या होत्या. हीच संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील अंदाजे २ ते २.५ तोळे सोने, १० तोळे चांदीच्या वस्तू व २ ते ३ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. या घटनेत कुटुंबाचे सुमारे २.५ ते ३ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, दुसरीकडे ठेवलेला सोन्याचा हार चोरट्यांच्या नजरेस न पडल्याने मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी बेळगावहून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले असून पोलिसांनी तपास अधिक गतिमान केला आहे. नागरी वस्तीत झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


Recent Comments