Belagavi

महागाई आणि दुष्काळ निवारणातील अपयशावरून बेळगावात जेडीएसचे आंदोलन

Share

दूध आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीसह दुष्काळ निवारणात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत बेळगावातील जेडीएस कार्यकर्त्यांनी गुरुवारी आंदोलन केले.

चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीत मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. पीकहानी, पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अशा अनेक समस्यांना शेतकरी सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देऊन दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजना करणे अपेक्षित असताना, सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

सर्वसामान्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी सरकार दरवाढ करून जनतेवर आर्थिक बोजा टाकत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याने सामान्य जनता आणि शेतकरी दोघेही त्रस्त असल्याचे जेडीएस कार्यकर्त्यांनी सांगितले.

दूध आणि जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ नियंत्रित करावी, जनहिताच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देऊन कृषी क्षेत्राला मदत करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

या आंदोलनात जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी, नासीर भागवान, प्रतापसिंह पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: