संविधानात मनुस्मृतीचे सर्व घटक समाविष्ट असल्याच्या कण्हेरी स्वामीजींच्या विधानावर माजी आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. राजू आलगूर यांनी तीव्र आक्षेप घेतला. स्वामीजींनी दलित समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
कोप्पळ जिल्ह्यातील गंगावती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाबाबत स्वामीजींनी केलेले वक्तव्य बेजबाबदार असल्याचे प्रा. आलगूर म्हणाले. या विधानामुळे दलित समाजासह लोकशाही आणि संविधानाचा आदर करणाऱ्या नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.

विजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. आलगूर यांनी स्पष्ट केले की, त्यांचा विरोध कोणत्याही स्वामीजी, धर्म किंवा समाजाच्या विरोधात नाही. सर्व धर्म, नागरिक आणि स्वामीजींबद्दल त्यांना आदर आहे. मात्र, संविधान आणि डॉ. आंबेडकर यांच्याबाबत चुकीची विधाने सहन केली जाणार नाहीत.
संविधान निर्मितीच्या वेळी ३९५ कलमे आणि ८ अनुसूच्या होत्या. त्यानंतर विविध घटनादुरुस्त्यांमुळे बदल झाले असून सध्या १२ अनुसूच्या आहेत. अशा महत्त्वपूर्ण संविधानाबाबत बोलण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक होते. अभ्यास न करता डॉ. आंबेडकर यांच्याबाबत बालिश वक्तव्य करणे निषेधार्ह असल्याचे आलगूर यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’मध्ये संविधान लागू झाले, त्यावेळी त्याच्या विरोधात लेख प्रसिद्ध झाले होते. संविधानात मनुस्मृतीचे घटक आणि आपल्या दृष्टिकोनातील भारतीयत्व नसल्याचे कारण देत विरोध करण्यात आला होता. संविधानाचा इतिहास समजून न घेता त्यावर भाष्य करणे योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
कण्हेरी स्वामीजींचे विधान म्हणजे डॉ. आंबेडकर यांचा आदर करणाऱ्या आणि भारतीय संविधानावर प्रेम करणाऱ्या कोट्यवधी नागरिकांचा अपमान आहे. स्वामीजींनी आपले विधान मागे घेऊन दलित समाजासह लोकशाही मानणाऱ्या सर्व नागरिकांची माफी मागावी. अन्यथा याविरोधातील आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा प्रा. राजू आलगूर यांनी दिला. यावेळी अहिंदचे नेते सोमनाथ कळ्ळिमनी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.


Recent Comments