बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील पाटील मळा परिसरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाला आणि गटारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विशेष अनुदानातून आमदार आसिफ सेठ यांनी आज या कामांचा प्रारंभ करून नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली.


पावसाळ्यात पाणी साचणे आणि नाल्यात गाळ जमा होण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार आसिफ सेठ यांनी पाटील मळा परिसरातील विकासकामांना चालना दिली. मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून सुमारे १.३० कोटी रुपये खर्चून १५३ मीटर लांबीच्या मोठ्या नाल्याचे बांधकाम आणि नाल्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासोबतच २० लाख रुपये खर्चून ३६५ मीटर लांबीच्या नवीन गटाराच्या बांधकामालाही प्रारंभ करण्यात आला आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर पाटील मळा आणि परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

कामांची पाहणी करताना आमदार आसिफ सेठ यांनी नागरिक आणि स्थानिक रहिवाशांकडून नाल्यासंदर्भातील विविध तक्रारी जाणून घेतल्या. विकासकामे सुरू असताना नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्यास अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्याची कडक सूचना त्यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना दिली. स्थानिकांच्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्यासह विविध नेते, महापालिकेचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी उपस्थित होते.


Recent Comments