विजापूर जिल्ह्यात ऊसदरावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे साखर कारखाने सुरू होण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. प्रतिटन ३,६०० रुपये दर देण्यास भिमा पट्ट्यातील सात कारखान्यांनी अद्याप सहमती दर्शवलेली नाही.
विजापूर जिल्ह्यात एकूण दहा साखर कारखाने आहेत. त्यापैकी भिमा पट्ट्यातील सात कारखान्यांचा उसाचा उतारा कमी असल्याने कृष्णा पट्ट्यातील कारखान्यांप्रमाणे ३,६०० रुपये दर देणे शक्य नसल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. या कारखान्यांचा उतारा ९.९ ते १०.२५ टक्क्यांदरम्यान आहे.

मात्र, दोन महिन्यांच्या आंदोलनानंतर निश्चित झालेला प्रतिटन ३,६०० रुपयांचा दर कमी करू नये, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. निर्धारित दर देण्याची ठोस हमी मिळाल्यानंतरच कारखाने सुरू करावेत, अशी त्यांची मागणी आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आनंद के. यांनी आज सायंकाळी चार वाजता विजापूर जिल्हा पंचायत सभागृहात साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत दराबाबतचा पेच सोडवण्याचा प्रयत्न होणार आहे. बैठक यशस्वी झाल्यास ८ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे.


Recent Comments