राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू झाला असून, जिल्हा प्रशासनाने प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, महाराष्ट्रात अधिक दर मिळत असल्याने कर्नाटकातही तातडीने राज्य सल्लागार दर जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे.
जिल्हा पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित करून साखर कारखाने सुरू केल्याने ऊस उत्पादकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे कारखाने सुरू होऊन शेतकऱ्यांची सोय झाली आहे. मात्र, महाराष्ट्रात प्रतिटन ३,९०० रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कर्नाटकातही ऊस नियंत्रण मंडळाने लवकरात लवकर राज्य सल्लागार दर निश्चित करावा, अशी मागणी शेतकरी नेते राघवेंद्र नायक यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे केली.

दरम्यान, सध्या निश्चित केलेला दर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपुरा असल्याचे मत शेतकरी नेते सुरेश परगण्णवर यांनी व्यक्त केले. जिल्हा प्रशासनाच्या तातडीच्या निर्णयाबद्दल आभार मानतानाच महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटकातील दर कमी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सल्लागार दरात किमान एक हजार रुपयांची वाढ करावी. केंद्र सरकारचा रास्त आणि किफायतशीर दर तसेच राज्याचा सल्लागार दर विचारात घेऊन शेतकऱ्यांना न्याय्य आणि लाभदायक भाव मिळवून देण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी सुरेश परगण्णवर यांनी केली.


Recent Comments