Khanapur

खानापूर तालुक्यात दिवसाढवळ्या दोन घरफोड्या; सात तोळे सोने, १.१५ लाखांची रोकड लंपास

Share

खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी क्रॉस परिसरात चोरट्यांनी दिवसाढवळ्या दोन घरांचे कुलूप तोडून सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख १५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. घरातील सदस्य मंदिरात आणि कामानिमित्त बाहेर गेले असताना ही चोरी झाली.

खानापूर-पारिश्वाड मार्गावरील कुप्पटगिरी क्रॉस येथे राहणारे सैन्यदलातील जवान दत्ता भाळेकर आणि शिक्षक ज्योतिबा होसूर यांच्या घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. दत्ता भाळेकर यांच्या पत्नी दर्शना या दवाखान्यात गेल्या असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील आठ ग्रॅम सोने आणि एक लाख रुपयांची रोकड चोरली. तर ज्योतिबा होसूर यांच्या पत्नी कपड्यांच्या दुकानात गेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाट फोडून सहा तोळे सोने, १०० ग्रॅम चांदीच्या वस्तू आणि १५ हजार रुपयांची रोकड लंपास केली.

घरातील सदस्य परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी खानापूर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करून तपासणी केली. परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे तपास सुरू आहे. तालुक्यात अलीकडे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांना लवकर अटक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Tags: