Belagavi

अस्वस्थ झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याची चूनप्पा पुजारींकडून विचारपूस

Share

ऊसदर निश्चिती आणि साखर कारखाने सुरू करण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या ताब्यात असताना अस्वस्थ झालेल्या जमखंडी येथील शेतकरी बसवराज यांची शेतकरी नेते चूनप्पा पुजारी यांनी बिम्स रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली.

ऊसदराच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले असता बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथील बसवराज यांना छातीत दुखू लागले. नुकतीच त्यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी झाली होती. त्यामुळे त्यांना तातडीने बेळगावच्या बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. चूनप्पा पुजारी यांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांच्या उपचारांची माहिती घेतली. बसवराज यांची प्रकृती धोक्याबाहेर असून, त्यांना जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर बळाचा वापर न करता सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी सन्मानाने वागावे, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, कारवार, विजापूर आणि हावेरीसह विविध जिल्ह्यांत ऊसदरासंदर्भात चर्चा आणि करारांची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच साखर कारखाने सुरू होतील, असे चूनप्पा पुजारी यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी निराश होऊ नये आणि कारखाने सुरू करण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण न करता शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांचे हित जपणे आणि त्यांच्या समस्या सोडविणे ही आपली जबाबदारी असून, त्यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार असल्याचे आश्वासन चूनप्पा पुजारी यांनी दिले.

Tags: