कागवाड तालुक्यातील मंगसुळी येथे मराठी आणि कन्नड भाषिकांनी एकत्र येत ७१ वा कर्नाटक राज्योत्सव उत्साहात साजरा केला.

भाषिक सलोख्याचे दर्शन घडविणाऱ्या या सोहळ्यात माजी जिल्हा पंचायत सदस्य रवींद्र पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले.

ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तहसीलदार रवींद्र हादिमनी, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी वीरन्ना वाली, महसूल निरीक्षक एम. बी. मुल्ला आणि पोलीस उपनिरीक्षक राघवेंद्र खोत यांच्या हस्ते भुवनेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

मंगसुळी हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गाव असून, मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. रवींद्र पुजारी यांच्या पुढाकारातून गेल्या काही वर्षांपासून दोन्ही भाषिकांना एकत्र आणून राज्योत्सव साजरा केला जात आहे.
यावेळी शाळांमधील विद्यार्थ्यांनी नाडगीत सादर केले. भुवनेश्वरी देवीच्या प्रतिमेची खुल्या वाहनातून मिरवणूक काढून ग्रामपंचायत आवारात आणण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

समारंभात रवींद्र पुजारी, मुंकुंद पुजारी, दत्तात्रय पुजारी, ग्रामपंचायत विकास अधिकारी संजय सूर्यवंशी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी डॉ. राजकुमार यांच्या ‘हुत्तिदरे कन्नड नाडल्ली हुत्तबेकू’ या गीतावर ठेका धरला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कर्नाटक रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते, शिक्षक, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

दरम्यान, कागवाड येथील मल्लिकार्जुन विद्यालयाच्या मैदानावरही तहसीलदार रवींद्र हादिमनी आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राज्योत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
शेडबाळ, शिरगुप्पी, जुगूळ, ऐनापूर आणि उगारसह तालुक्यातील विविध गावांतही राज्योत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सुकुमार बन्नुरे, इन न्यूज कागवाड


Recent Comments