प्रति टन उसाला ५,५०० रुपये दर आणि एसएपी व एफआरपी दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या कर्नाटक बंदला धारवाड जिल्ह्यात व्यापक पाठिंबा मिळत आहे.

धारवाड तालुक्यातील निगडी गावाजवळ शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्याने शेकडो वाहने रस्त्यावर अडकली आणि वाहतूक ठप्प झाली.

ऊस उत्पादकांचे आंदोलन तीव्र झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धारवाडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या परिसरात निषेधाज्ञा लागू केली आहे. बेळगाव सीमेलगतच्या तेगूर गावापासून हुबळी तालुक्यातील वरूर गावापर्यंत महामार्ग रोखण्याची शक्यता असल्याचा अहवाल धारवाड पोलीस अधीक्षकांनी दिला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. मात्र, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा रोष कायम असून, केंद्र आणि राज्य सरकारांविरोधात तीव्र आंदोलने सुरू आहेत.
दरम्यान, धारवाड जिल्ह्यातील अळणावर तालुक्यातील होन्नापूर ग्रामस्थांनी धारवाड ते गोवा या मार्गावरील राज्य महामार्गावर रास्ता रोको करून मोठे आंदोलन केले. त्यामुळे या रस्त्यावरही शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या असून, नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील गावागावांत बंदला पाठिंबा मिळत असून, सरकारने तातडीने मागण्यांची दखल घेऊन त्या मान्य न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.


Recent Comments